दारू आणि लिव्हर

दारू यकृता शिवाय इतर अनेक अवयवांवर वाईट परिणाम करू शकते.
by: डॉ. महेश मांगुळकर


loading


नाशिक (ऑगस्ट २०२२) - दारूमुळे लिव्हर म्हणजेच यकृत खराब होते हे सगळ्यांनाच माहित असते पण दारू यकृता शिवाय इतर अनेक अवयवांवर वाईट परिणाम करू शकते. दारू मुळे स्वादुपिंडाचे आजार , किडनी चे आजार , मोठ्या आतड्यांचे कॅन्सर असे सिद्ध झालेले व अनेक शक्यता असलेले आजार होऊ शकतात. जसे की वर दाखविलेल्या फोटो (इंटरनेटवरून साभार) मध्ये, ४३ वर्षीय व्यक्ती च्या मेंदूवर दारूमुळे झालेले दुष्परिणाम स्पष्ट दिसून येतात.

यकृत आणि आरोग्य

यकृताची कामे:

- शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.
- तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.
- शरीरातील सुमारे 7 टक्के लोह यकृतात साठवलेले असते.
- यकृता मध्ये सहा महिने पुरेल एवढा अ जीवनसत्व चा साठा असतो
- आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
- निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिन ची निर्मीती करणे.
- तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
- आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.

आपल्या शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबोलिजम सांभाळणे मध्ये यकृताचा सिंहाचा वाटा असतो. आपले अन्न औषधे व्यर्थ पदार्थ अशा बऱ्याच गोष्टींचा चयापचय यकृतात घडत असतो. लिव्हरचे काम कमी झाले तर आपल्याला आरोग्याचे वेगवेगळे त्रास सुरू होतात . हे आजार अतिशय गंभीर सुद्धा ठरू शकतात. हृदय किडनी मेंदू यासारखा यकृत सुद्धा आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दुर्दैवाने लोकांमध्ये याविषयी तशी जागृती नाही.

आजच्या लेख मध्ये आपण यकृत संबंधी माहिती घेउया. लिव्हर(यकृत) हा एक खूप महत्वाचा अवयव आहे. दारू आपल्या यकृतावर कसा परिणाम करते ते बघू.

दारू आणि मेंदू

मद्याचा हवाहवासा प्रभाव मेंदूवर होतो आणि या प्रभावासाठी खरे म्हणजे लोक दारू पितात. दारूचे प्रमाण रक्तात वाढले की नशेची भावना येते. काही काळाने हे प्रमाण कमी होते आणि नशा सुद्धा कमी होते. दारू मधील मुख्य रसायन ‘इथानोल ‘ (C ₂H ₅OH) हे असते.

दारू चे पुढे काय

इथानोल यकृता मध्ये पचवल्या जाते. लीवरच्या पेशी इथानोल या दारूला ॲसिटलडीहाईड (C2H4O) नावाच्या अल्डीहाईड रसायना मध्ये बदलतात. हे अल्डीहाईड रसायन पुढे असेटेट (कमी विषारी पदार्थ ) मध्ये रूपांतरण करून शरीराबाहेर टाकले जाते.

असेटेट रूपांतरण ची क्रिया हि मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे कमी प्रमाणात दारू घेतल्यास शरीर हे अल्डीहाईड सुरक्षितपणे हाताळू शकते. पण जास्त प्रमाणात अल्डीहाईड जमा झाल्यास यकृतावर त्याचा जास्त भार पडतो आणि पेशींना इजा व्हायला सुरुवात होते.

पेशींमध्ये जास्त अल्डीहाईड झाले तर त्यातून फ्री ऑक्सिजन रॅडीकल नावाचे पदार्थ तयार होतात. आपल्या पेशीमध्ये फ्री ऑक्सिजन रॅडीकल ला हाताळण्यासाठी एक प्रणाली असते. अल्डीहाईडचे प्रमाण जास्त झाले तर जास्त फ्री रॅडीकल तयार होतात. मग त्यांना हाताळणारी यंत्रणा पूर्णपणे थकून जाते. मग अशा वेळी अजून नवीन फ्री रॅडीकल तयार झाले तर पेशींना इजा होते. त्यामुळे हळू हळू यकृत खराब होते.

सतत अल्डिहाइडचा मारा असेल तर पेशीमध्ये दाह (inflammation) सुरु होते. अल्डिहाइड पेशींच्या प्रथिनांवर परिणाम करू शकतात. आपल्या जनुकाना सुद्धा इजा पोहचवू शकतात आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. खूप काळ अल्डिहाइडचा मारा शरीरावर झाला तर असे परिणाम जास्त प्रमाणात दिसतात.

यकृतावर होणाऱ्या इजेचे प्रकार

फॅटी लिव्हर (चरबी) -

यकृताला इजा व्हायला सुरुवात झाली की ती सुरुवातीला दिसते ती म्हणजे फॅटी लिव्हर च्या स्वरूपात. ह्याचा काही त्रास जाणवत नसला तरी इजा होण्याची सुरुवात झालेली असते. सोनोग्राफी मध्ये यकृतात चरबी जमा झालेली दिसते. कधी कधी रक्ताच्या तपासणीत लिव्हर इंझाईम अगदी थोडेसे वाढेलेले दिसतात. असे बदल दिसल्यास धोक्याची घंटी समजावी. दारूचे सेवन बंद केल्यास हे पूर्ण बरे होऊ शकते.

अल्कोहोलिक हिपॅटायटीस (कावीळ व यकृतावर सूज) -

कमी वेळात अति जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यास यकृताच्या पेशींना जास्त इजा झाली तर रक्तातील लिव्हर इन्झाईम चे प्रमाण खूप वाढते. बिलिरुबीनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे कावीळ दिसू लागते. मळमळ उलटी होणे, अशक्त वाटणे , पोटात दुखणे अशी लक्षणे सुद्धा दिसू शकतात. यकृतावर सूज मोठ्या प्रमाणात आली तर यकृताचे कामच बंद पडू शकते. हे गंभीर असते व यात अगदी जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. त्रासाच्या सुरुवातीलाच दारू बंद करून योग्य उपचार केले तर हे बरे होऊ शकते.

सिऱ्होसीस (यकृत कडक) -

यकृतावर वारंवार सूज आली, वारंवार इजा झाली तर यकृतावर व्रण निर्माण होतात. काही काळानंतर इतके व्रण तयार होतात की यकृत कडक होऊन जाते. सोनोग्राफी मध्ये सुद्धा हे दिसते. यकृतामध्ये काम करणाऱ्या पेशी अगदी कमी उरतात. बाकी सगळे व्रणच असतात जे यकृताचे काम करू शकत नाही. अशावेळेस यकृताचे काम खूपच बिघडून जाते. शरीरातील व्यर्थ पदार्थांचे प्रमाण वाढणे, मेंदूचे काम नीट न होणे, पोटात पाणी जमा होणे असे अनेक दुष्परिणाम दिसायला लागतात. असे व्यक्ती सतत थकलेले असतात. त्यांना वारंवार आजारपण येते. बरेचदा दवाखान्यात भरती करावे लागते. ही आजाराची टोकाची पातळी झाली. अशी परिस्थिती येऊच नये असा प्रयत्न करणे गरजेचे असते.

उपचार पद्धती आणि पर्याय -

लिव्हर आजाराच्या पेशंट चे प्रथम पूर्ण परीक्षण करून आजाराचे स्टेजिंग केल्यानंतर औषध दिल्या जातात. आजार जसा जसा बळावत जातो तसे पेशंट ला लिव्हर प्रत्यारोपणाचा(Liver Transplant) सल्ला दिला जातो.

यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण खूप चांगले जीवन जगू शकतो. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २७ वर्षेही यकृत प्रत्यारोपणानंतर जगलेला रुग्ण आहे.