भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध; बायपासच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा
संजयकाका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश!by: अन्वर इनामदार
तासगाव (३० जुलै २०२७) - तासगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या बहुप्रतीक्षित तासगाव बायपासच्या कामाला आता निर्णायक गती मिळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील विटा–तासगाव–रेहाट मार्गावरील प्रस्तावित बायपाससाठी आवश्यक भूसंपादनाचे राजपत्र अखेर प्रसिद्ध झाले आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव बायपाससाठी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भूसंपादन तसेच प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याला आता मोठे यश मिळाले आहे.
राजपत्रानुसार आळते, लिंग, विसापूर, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठेएकंद आणि तासगाव या ११ गावांमधील सुमारे ४९ हेक्टर जमिनीचे संपादन व अधिग्रहण करण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा दिलासा!
तासगाव शहरातून राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. प्रस्तावित बायपास पूर्ण झाल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्याने तासगाव बायपासच्या प्रत्यक्ष उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, तासगावकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे.