उद्योग, संघटन आणि स्वावलंबनाचा संकल्प

सलगरे येथे शिव उद्योग सहकार सेनेची दमदार संघटनात्मक बैठक; तालुकानिहाय सक्षम संघटन उभारणीचा निर्धार
by: अन्वर इनामदार


loading


Miraj (2026-08-24) - सलगरे, मिरज तालुका : शिवसेना–शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्ह्याच्या वतीने सलगरे येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे होते. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सक्षम व कार्यक्षम कार्यकारिणी उभारून संघटनेला तळागाळापर्यंत बळकटी देणे, पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने व समन्वयाने काम करणे, समाजातील प्रत्येक घटकाशी सातत्यपूर्ण जनसंपर्क वाढविणे तसेच उद्योग, रोजगार आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा बैठकीचा प्रमुख सूर राहिला. यावेळी शासकीय योजना, बँकांची धोरणे, नवउद्योजकांसाठी उपलब्ध संधी, महिला उद्योग, युवकांचे कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. केवळ पदाधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेणारा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. युवक, महिला आणि नवउद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उद्योग मार्गदर्शन शिबिरे, उद्योजक मेळावे आणि जनजागृती उपक्रम आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हे संघटनेच्या कार्याचे महत्त्वाचे अंग असावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. तसेच पक्षशिस्त, संघटनात्मक बांधिलकी आणि पक्षादेशाची तातडीने अंमलबजावणी याबाबत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना न राहता काम, जनसेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले. कार्यक्रमाचे स्वागत मिरज तालुका अध्यक्ष राहुल खाडे यांनी केले, तर आभार डॉ. सदाशिव कांबळे यांनी मानले. बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम भोसले आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ. उषा गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. रामेश्वर वाडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी स्वागत करून संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “उद्योगातून रोजगार, संघटनेतून शक्ती आणि समाजसेवेतून विश्वास” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शिव उद्योग सहकार सेनेचे कार्य सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.