नाशिकमध्ये १८ हजार बनावट जन्मदाखल्यांचा घोटाळा? २०१६ पासूनच्या नोंदी

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतीय ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी हे बनावट दाखले तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समजते
by: सुदाम पेंढारे


loading


नाशिक (१७ फेब्रुवारी २०२६) - मालेगावमधील बनावट जन्मदाखल्यांच्या प्रकरणानंतर आता नाशिक शहरातही असाच मोठा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २०१६ नंतर सुमारे १८,००० जन्मदाखले संशयास्पद किंवा बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सोमय्या यांनी सोमवारी नाशिक महापालिकेत (राजीव गांधी भवन) आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आलेल्या एका विशिष्ट जन्मदाखल्याचा पुरावा सादर केला. शेख नायरा नूर मोहम्मद या नावाने काढलेला हा दाखला बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान जुन्या नोंदी अपलोड करताना हा घोटाळा झाल्याचा त्यांचा संशय आहे.

मालेगावप्रमाणेच नाशिकमध्येही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतीय ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी हे बनावट दाखले तयार करणारे रॅकेट सक्रिय आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. हे दाखले सातपूर विभागातून जारी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.

या आरोपांची गांभीर्याने दखल घेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या १८,००० दाखल्यांची पडताळणी येत्या आठवडाभरात केली जाईल. यात जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे.

दरम्यान, या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. विचारलेल्या काही प्रश्नांमुळे सोमय्या भडकले आणि त्यांनी विशिष्ट अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करत पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेले.

ऑनलाइन पोर्टलवर बॅकडेटेड (Back-dated) नोंदी करून बनावट दाखले तयार केले गेले. यामुळे नाशिक महापालिकेचा सातपूर विभाग आणि आरोग्य विभाग मुख्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

महानगरपालिकेने चौकशीसाठी विशेष समिती नेमली असून एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.