मातीला अंतर देऊ नका, माती तुम्हाला अंतर देणार नाही

आबांचं स्वप्न, रोहितदादांची कृती; ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीकडे वाटचाल
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (29 जून 2026) - "मातीला अंतर देऊ नका, माती तुम्हाला अंतर देणार नाही," हे स्वर्गीय लोकनेते, माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांचे शब्द आजही तासगाव-कवठेमहांकाळच्या विकासाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या स्वप्नातील एमआयडीसी साकार करण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाल्याचे चित्र समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्य पत्रे

माजी आमदार सुमनताई पाटील आणि आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन तासगाव-कवठेमहांकाळ एमआयडीसीबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी दोन कंपन्यांनी सुमारे ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्य पत्रे (EOI) सादर केली. त्यामुळे या भागातील औद्योगिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जागतिक स्तरावर एमआयडीसीची मांडणी

बैठकीला डॉ. पारीख (इंडो-अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्स) आणि श्री. पुराणिक (जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटी) यांच्या प्रतिनिधीमंडळांची उपस्थिती होती. तासगाव एमआयडीसीची अमेरिका आणि जपानमधील उद्योगजगतासमोर मांडणी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतिनिधीमंडळांसह सादरीकरण करण्याबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

रोजगार निर्मितीला चालना

एमआयडीसीमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच तासगाव-कवठेमहांकाळ परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आबांच्या विचारांचा वारसा

स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांनी मांडलेली सर्वसामान्यांच्या विकासाची भूमिका आणि स्थानिक रोजगाराचे स्वप्न पुढे नेण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्थानिक विकासाला जागतिक गुंतवणुकीची जोड देण्याचा प्रयत्न म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.