तासगावात कस्तुरबा प्रसूतीगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे नगरपालिकेला धडक निवेदनby: अनवर इनामदार
तासगांव, सांगली (16 फेब्रुवारी २०२६) - तासगाव शहरातील गरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवून बंद पडलेले कस्तुरबा प्रसूतीगृह तात्काळ सुरू करावे, अशी जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत आज तासगाव नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर लेवंडे यांना धडक निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, तासगाव नगरपालिकेच्या इमारतीत पूर्वी चालणारे कस्तुरबा प्रसूतीगृह पंचक्रोशीतील महिलांसाठी मोठा आधार होता. मात्र इमारत जुनी झाल्याच्या कारणावरून ते बंद करण्यात आले. त्यानंतर सुरू करण्यात आलेले ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय शहरापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर, विरळ वस्तीच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे.
सदर रुग्णालयाच्या परिसरात कोणतीही बाजारपेठ नसल्याने रुग्णांना आवश्यक साहित्य मिळत नाही. नातेवाईकांना किरकोळ वस्तूंसाठी शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांकडे वळत असून गरीबांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ग्रामीण रुग्णालयात सक्षम ऑपरेशन थिएटर व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याचाही गंभीर मुद्दा निवेदनात मांडण्यात आला.
नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेल्या इमारतीत सध्या आरोग्य शिक्षण पथकाचा दवाखाना सुरू असताना, त्याच ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध करून कस्तुरबा प्रसूतीगृह पुन्हा सुरू करणे शक्य आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या वेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार, जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ, तालुका सहसचिव श्रीधर माने, सहसचिव सुनील लोहार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष शंकर तांदळे, समाजसेवक भरत थोरात, बाबू अण्णा थोरात, सदाशिव माने उपस्थित होते. पत्रकार शकील मुल्ला व संभाजी माळी यांनीही हजेरी लावली.