तुरची येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टी
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्याचा संदेशby: अनवर इनामदार
तुरची(सांगली) (१९ मार्च २०२६) - पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर 29 व्या रोजाच्या निमित्ताने युवा नेते दीपक पाटील यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काजू, केळी, बदाम, द्राक्षे, सफरचंद आदी फळांची मेजवानी उपस्थितांसाठी ठेवण्यात आली होती. उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला तुरची गावचे प्रशासक मा. विकास डावरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत जागतिक शांततेचा संदेश दिला. सध्या जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मानवजातीने प्रगतीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे, युद्धाचा नव्हे, असे त्यांनी सांगितले. बलाढ्य देशांच्या चुकीमुळे संपूर्ण जगावर त्याचे परिणाम होऊ शकतात, त्यामुळे युद्ध टाळण्यासाठी सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार यांनी तुरचीतील मुस्लिम बांधवांच्या वतीने दीपक पाटील यांचे इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल विशेष आभार मानले. तसेच जगभर सुरू असलेल्या संघर्षांविरोधात निषेध व्यक्त करत सर्व देशांनी शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिलावर मुल्ला (गुरुजी) यांनीही मुस्लिम समाजाच्या वतीने दीपक पाटील यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला कमालसो मुल्ला (गुरुजी), जावेद मुल्ला, पत्रकार शकील मुल्ला, हमीद मुल्ला, दस्तगीर मुल्ला, झाकीर मुल्ला, शाहिद होबळे, सुलेमान मुल्ला, सरफराज मुल्ला, जाहीर मुल्ला, सुपियान मुल्ला, इमरान मुल्ला, सिकंदर मुल्ला तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दीपक पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. पुढील काळातही सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणारे असे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.