मिरज पंचायत समिती सभागृहात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना, मिरज तालुका व पंचायत समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमानेby: प्रतिनिधि
मिरज (सांगली) (१७ मार्च २०२६) - आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना, मिरज तालुका व पंचायत समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील पंचायत समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर न्याय दंडाधिकारी सांगली येथील डॉ. स्नेहल कणीचे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या नूतन सभापती तन्वी कमलेकर होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शिराळा तालुका सचिव विजय शेणवी यांनी कवितेच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी केले.
यावेळी डॉ. स्नेहल कणीचे यांनी उपस्थित महिला अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रीकृष्ण मोहिते यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तासगाव तालुका अध्यक्ष दीपक पाटील, शिराळा तालुका उपाध्यक्ष संदीप बागडे तसेच मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष तन्वी कमलेकर यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाचे नियोजन मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर, सचिव सागर आठवले व शहर सचिव कुमार भंडारे यांनी केले. त्यांच्या कार्याचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
कार्यक्रमास महिला व बालकल्याण विभागाच्या विद्या लाटणे, उपसभापती ललिता शेजुळकर, विविध तालुक्यांतील पदाधिकारी, महिला अधिकारी, ग्रामसेविका व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.