नाशिक जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

५० हजारांची लाच घेताना महिला कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहाय्यक रंगेहाथ पकडले
by: सुदाम पेंढारे


loading


नाशिक (१९ मार्च २०२६) - जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक अरुण धारणकर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गेल्या १५ दिवसांत जिल्हा परिषदेत उघड झालेला हा दुसरा मोठा लाचखोरीचा प्रकार असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

नियोजितप्रमाणे तक्रारदाराने आरोपींना पैसे देताच एसीबीच्या पथकाने कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा असून, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.