चल हल्ला बोल हा चित्रपट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार
दलित-बहुजनांच्या आवाजाला जागतिक व्यासपीठby: प्रतिनिधि
तासगाव, सांगली (2026-02-23) - सांगली जिल्ह्यातील खरसिंग (ता. तासगाव) येथे चित्रीकरण झालेल्या चल हल्ला बोल या लोकसहभागातून साकारलेल्या चित्रपटाची प्रतिष्ठित Cannes Film Festivalमध्ये अधिकृत निवड झाली आहे. संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या चित्रपटामुळे भारतीय सिनेइतिहासात महत्त्वाची नोंद झाली आहे.
दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्यांक, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या जीवनातील वेदना, संस्कृती व अन्यायाविरोधातील आवाज जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने उभी राहिलेल्या “Peoples Movie चळवळी”चा हा पहिला चित्रपट आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची फेस्टिव्हल फी माफ करण्यात आली असून हा सन्मान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभूतपूर्व मानला जात आहे.
सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी Central Board of Film Certificationने “कोण नामदेव ढसाळ?” असा प्रश्न उपस्थित करत सुरुवातीला परवानगी नाकारली होती. या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. रस्ता रोको, मोर्चे, निवेदने तसेच कवी Namdeo Dhasal यांच्या कवितावाचनातून निषेध व्यक्त करण्यात आला.
जनतेच्या तीव्र दबावानंतर अखेर चित्रपटाला परवानगी देण्यात आली; मात्र Adult प्रमाणपत्र देण्यात आले.
१५० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार
स्थानिक अडथळ्यांवर मात करत चल हल्ला बोलने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १५० पेक्षा अधिक पुरस्कार पटकावले आहेत. आता कान्समधील निवडीमुळे हा चित्रपट जागतिक प्रेक्षकांसमोर झळकणार आहे.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक महेश भिमराव बनसोडे म्हणाले,
ही केवळ फिल्म नाही; लोकांच्या संघर्षातून उभी राहिलेली चळवळ आहे. हा स्वीकार आमच्या आवाजाला जगभर पोहोचवणारा आहे.
लोकसहभागातून उभारलेली निर्मिती
या चित्रपटासाठी आर्थिक मदत, साहित्य, लोकेशन्स आणि कलाकार—सर्व काही चळवळीतील लोकांनीच उभे केले. नंदकुमार पाटील, कृष्णा (नाना) म्हेत्रे, राधेश्याम जाधव, डॉ. साळवे, रवी भिलाणे, सुबोध मोरे, सुमेध जाधव, संजय शिंदे, विठ्ठल लाड, डॉ. दत्ता माने, राकेश कांबळे, मिलिंद कांबळे, मयूर शिर्के, संतोष अभंगे, फिरोज मुल्ला, वर्षा महाडिक, स्वप्ना विश्वनाथ नाथ, ज्योती बडेकर, अशोक हिरगुडे, पोपट सातपुते, प्रा. आनंद हाबळे, अॅड. नितीन सातपुते (सुप्रीम कोर्ट) व सिनेस्टार सौ. प्रतिभा शर्मा यांचे विशेष योगदान राहिले.
स्वाभिमानाचा ऐतिहासिक क्षण
चल हल्ला बोलचा हा प्रवास दाखवतो की सिनेमा केवळ मनोरंजन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार, प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ, सहसचिव दीपक पाटील, शहराध्यक्ष भानुदास पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. संजय देवकळे आदींनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
— बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा जागतिक विजय.