सांगलीत आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
कर्तव्यदक्ष सांगली महिला पोलीस ए. आर. मुल्ला तिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनby: अनवर इनामदार
सांगली (१७ फेब्रुवारी २०२६) - आद्यक्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगली येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्तबगार व कर्तव्यदक्ष सांगली महिला पोलीस ए. आर. मुल्ला यांच्या हस्ते लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लहुजी वस्तादांच्या कार्याचा गौरव केला. लेखणीपुत्र कुलदीप देवकुळे यांनी सांगितले की, लहुजी वस्तादांनी आपल्या शौर्य, पराक्रम आणि शस्त्रास्त्रविद्येच्या अद्वितीय कौशल्याच्या बळावर अनेक तरुणांमध्ये स्वराज्याची जाज्वल्य भावना निर्माण केली. त्यांनी तरुणांना केवळ शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा, गुलामगिरीविरुद्ध लढण्याचे धैर्य आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली.
मातंग समाजाचे युवा नेते व साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे (मेजर) यांनीही लहुजी साळवे यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, सामाजिक समतेचा आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणारे लहुजी वस्ताद साळवे होते. त्यांच्या ‘सामाजिक समते’च्या स्वप्नाला पूर्णत्व देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दादासो कस्तुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्जुन मजले यांनी केले.