दसऱ्यानिमित्त तुरची गावात अनोखी परंपरा

मुस्लिम कुटुंबाकडून पुजाऱ्यांचा सन्मान!
by: अन्वर इनामदार


loading


तुरची(सांगली) (२ ऑक्टोबर २०२५) - तुरची गावात धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा एक अनोखा आदर्श दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने जपला जात आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांचा बदल दसऱ्याच्या सिमोलंगनाच्या दिवशी करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा येथे आहे. मात्र, या परंपरेत सर्वात महत्त्वाचा आणि कौतुकास्पद भाग म्हणजे, मागील वर्षभर सेवा बजावलेल्या पुजाऱ्यांचा सन्मान गावातील मुस्लिम कुटुंबीयांच्या वतीने केला जातो.

​यावर्षीही ही आदर्श परंपरा मोठ्या उत्साहात पाळण्यात आली. यानुसार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. दिलावर मुल्ला आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते मंदिराचे मावळते पुजारी सौ. व श्री. नंदकुमार पांडुरंग गुरव यांचा शाल, श्रीफळ आणि फुल आहेर देऊन सपत्नीक आणि मनोभावे सन्मान करण्यात आला. ​यावेळी गावातील ग्रामस्थ, मान्यवर आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या सामाजिक सलोख्याच्या सोहळ्याचे साक्षीदार होऊन आनंद व्यक्त केला.

​बंधुता आणि ऐक्याचा संदेश-
​मंदिराची स्वच्छता, भक्ती आणि धर्मनिरपेक्षतेचा आदर्श संदेश समाजात पोहोचवणे हा या परंपरेमागील मुख्य उद्देश आहे. वर्षभर निष्ठेने सेवा केलेल्या पुजाऱ्यांचा गौरव मुस्लिम बांधवांच्या हस्ते होत असल्याने, हा सोहळा समाजात धर्मसामंजस्य आणि बंधुता रुजवणारा ठरतो आहे. तुरची गावात अनेक वर्षांपासून जपली जाणारी ही परंपरा खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश संपूर्ण समाजात पोहोचवत आहे.