श्री सिद्धनाथ हायस्कूल आरवडे येथे विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
हा प्रबोधन कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक म्हणून असलेले हक्क आणि एक नागरिक म्हणून मानवाधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणारा ठरला.by: अन्वर इनामदार
आरवडे, सांगली जिल्हा (८ डिसेंबर २०२५) - ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा सांगली आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आरवडे येथील श्री सिद्धनाथ हायस्कूल येथे विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागरूकता आणि मानवी हक्कांविषयी (Human Rights) मूल्ये रुजवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रबोधनाची सुरुवात करताना किरण जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून उपस्थितांना १० डिसेंबर मानवाधिकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. आलमशहा मोमीन यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांसह ग्राहक जागरूकतेचे महत्त्व विशद केले. तसेच बाजारात होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीची माहिती देत, विद्यार्थ्यांनी नेहमी सजग राहण्याचे आवाहन केले. फसवणूक झाल्यास तक्रार निवारण प्रक्रिया, न्याय मिळवण्यासाठीची कायदेशीर साधने आणि फसवणूक टाळण्यासाठीचे मार्ग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबतच, मोमीन यांनी मानवाधिकार मूल्ये, तसेच स्वातंत्र्य, समता व बंधुता या विषयांवरही विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सांगली जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अन्वर इनामदार यांनी यावेळी सर्वांना मानवाधिकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, कार्यक्रमास तालुका सचिव विशाल टेके यांची विशेष उपस्थिती लाभली.
हा प्रबोधन कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक म्हणून असलेले हक्क आणि एक नागरिक म्हणून मानवाधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणारा ठरला.