एलॉन मस्कच्या स्टारलिंक सोबत भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील ठरले पहिले राज्य

महाराष्ट्राची ऐतिहासिक झेप!
by: आफताब शेख, ब्युरो चीफ, मुंबई


loading


मुंबई (५ नोव्हेंबर २०२५) - महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीमध्ये आज एक ऐतिहासिक दिवस ठरला! इलॉन मस्क यांच्या मालकीची जगातील अग्रगण्य उपग्रह इंटरनेट कंपनी स्टारलिंक (Starlink) सोबत औपचारिकपणे करार (Letter of Intent - LOI) करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी या लेटर ऑफ इंटेंटवर (LoI) स्वाक्षरी केली.

दुर्गम भागांत सुपरफास्ट इंटरनेट
या करारामुळे महाराष्ट्रातील डिजिटल दरी (Digital Divide) मिटवण्याचे मोठे उद्दिष्ट साध्य होणार आहे. स्टारलिंकच्या हाय-स्पीड उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेचा लाभ विशेषतः राज्यातील दुर्गम आणि वंचित जिल्ह्यांना मिळणार आहे.

  • लक्ष्यित जिल्हे: गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम.
  • लाभार्थी: सरकारी संस्था, ग्रामपंचायती, आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आपत्ती नियंत्रण कक्ष.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, "स्टारलिंक महाराष्ट्राशी हातमिळवणी करत असल्याने, आपण शेवटच्या डिजिटल दरीला जोडत आहोत. प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक आरोग्य केंद्र आता डिजिटल संपर्कात येणार आहे, कितीही दुर्गम असो. ही भागीदारी फ्युचर-रेडी आणि पूर्णपणे जोडलेले महाराष्ट्र घडविण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." डिजिटल महाराष्ट्रला बळ

    हा सहयोग महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल महाराष्ट्र मोहिमेला बळ देतो. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या सार्वजनिक सेवांची उपलब्धता सुधारेल. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अभियानासाठी ग्रामीण स्तरावर एक नवीन आदर्श (Benchmark) स्थापित करेल.

    स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर या सेवेची अंमलबजावणी सुरू होईल.