पुण्यात थरार! नाना पेठेत तरुणाची गोळ्या झाडून हत्या

मृत तरुणाचे नाव आयुष उर्फ गोविंद कोमकर असे असून, तो कुख्यात गुंड गणेश कोमकर याचा मुलगा होता.
by: सुदाम पेंढारे


loading


पुणे (५ सप्टेंबर २०२५) - पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच शहरातील नाना पेठ परिसरात टोळीयुद्धातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आयुष उर्फ गोविंद कोमकर असे असून, तो कुख्यात गुंड गणेश कोमकर याचा मुलगा होता. ही घटना आज रात्री नाना पेठेतील नवरंग मित्र मंडळाजवळ घडली. गोविंद हा त्याच्या घराखाली थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे गोविंद गंभीर जखमी झाला.

गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गोविंदला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येतील मुख्य आरोपींमध्ये गोविंद कोमकरचे वडील गणेश कोमकर यांचा समावेश होता. त्यामुळे आंदेकर टोळीने याच खुनाचा बदला घेण्यासाठी गोविंदला लक्ष्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील अशा संवेदनशील भागात घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पुढील तपास पुणे पोलिस करत आहेत.