सांगलीवाडीत हॉटेलमधील वादातून तरुणाचा खून; दोन पोलीस भावांसह तिघांवर गुन्हा

मारहाणीचा हा सर्व थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
by: प्रतिनिधि


loading


सांगली (१३ नोवेंबर २०२६) - सांगलीवाडी येथील ईश्वरपूर रस्त्यावरील हॉटेल अनुयश मध्ये झालेल्या वादातून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने एका तरुणाचा बेदम मारहाण करून खून केला. विजय वसंत पाटील (वय ३६, रा. सांगलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशील भीमराव सरगर, सुमित भीमराव सरगर आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास विजय पाटील आणि हॉटेल मालक तथा माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्यात काही कारणावरून वाद सुरू होता. यावेळी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या सुशील व सुमित या पोलीस भावांनी आणि त्यांच्या साथीदाराने मध्यस्थी करत विजयला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यांनी विजयचे डोके भिंतीवर आणि लोखंडी शटरवर आपटल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मारहाणीचा हा सर्व थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक हरिदास पाटील यांचीही चौकशी सुरू केली आहे.