स्वा. रा. भारती विद्यामंदिरात डॉ. कलाम यांची जयंती उत्साहात संपन्न
वाचन प्रेरणा दिन ही साजराby: अन्वर इनामदार
तासगाव (2026-10-16) -
तासगाव : येथील स्वा. रा. भारती विद्यामंदिर येथे डॉ. ए. पी. जे. कलाम यांना अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.
तासगाव : येथील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भरत थोरात व तमन्ना शेख हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील विद्यार्थिनींनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर आपली मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भरत थोरात यांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे शैक्षणिक विचार आणि वाचनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी ज्ञानाची आवड, जिद्द, मेहनत आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. परमानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सूत्रसंचालन कु. ए. यू. शहारे यांनी केले. आभार किणीकर यांनी मानले.