जय भारत समाज सेवा मंडळात भारतभूषण व सैनिक रत्न पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

ध्वनीशास्त्रज्ञ मा. अब्दुलरहीम (बाळासाहेब) इब्राहिम मुल्ला यांना भारतभूषण पुरस्कार-२०२६ तसेच सैनिक मित्र (सैनिक रत्न) पुरस्कार-२०२६
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव, सांगली (२९ जुलै २०२६) - मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात ध्वनीशास्त्रज्ञ मा. अब्दुलरहीम (बाळासाहेब) इब्राहिम मुल्ला यांना भारतभूषण पुरस्कार-२०२६ तसेच सैनिक मित्र (सैनिक रत्न) पुरस्कार-२०२६ या दोन प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा जय भारत समाज सेवा मंडळ, तासगाव यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

जय भारत समाज सेवा मंडळाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष मा. अनवर इनामदार यांनी अब्दुलरहीम (बाळासाहेब) मुल्ला यांच्या ध्वनीशास्त्र क्षेत्रातील पाच दशकांच्या संशोधन कार्याचे, समाजसेवेचे आणि सैनिकांप्रती असलेल्या सेवाभावी योगदानाचे विशेष कौतुक केले. यावेळी सांगली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पदाधिकारी मा. आलमशहा मोमीन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यातर्फे सैनिक रत्न पुरस्कार-२०२६ प्राप्त झालेले डॉ. आनंदराव पवार यांचाही आरोग्यदूत निसार मुल्ला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कारगिल विजय दिनाच्या औचित्याने प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजूत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी सांगितले की, "समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ध्वनीशास्त्रज्ञ अब्दुलरहीम (बाळासाहेब) मुल्ला आणि डॉ. आनंदराव पवार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्यातून युवकांना राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते."

कार्यक्रमास आलमशहा मोमीन, जय भारत समाज सेवा मंडळाचे तासगाव तालुका उपाध्यक्ष सुनील लोहार, कृषीमित्र वसंतराव माळी, समाजसेवक प्रमोद वाघ, संजय माने (आरवडे), मुजफ्फर मुलानी (शिरढोण), ॲड. मुन्ना नदाफ तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी दोन्ही पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.