महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

साहित्य चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प; अध्यक्षपदी प्रा. संजय ठिगळे
by: अन्वर इनामदार


loading


सांगली (१९ जून २०२६) - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेची नूतन कार्यकारिणी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. माजी अध्यक्ष प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली. साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय ठिगळे यांची शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. अनिल मडके आणि प्रमोद चौगुले, कार्यवाहपदी कवी अभिजित पाटील व कवयित्री वर्षा चौगुले, तर कोषाध्यक्षपदी ग्रामीण कथाकार सचिन पाटील यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून महेश कराडकर, भीमराव धूळूबुळू, डॉ. भीमराव पाटील, कुलदीप देवकुळे, प्रदीप सुतार, महादेव माने, मनीषा पाटील आणि प्रा. लता ऐवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी अध्यक्ष प्रा. वैजनाथ महाजन यांनी मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने नवे लेखक, नवे विषय आणि नवी अभिव्यक्ती पुढे येत असल्याचे सांगितले. नवोदित साहित्यिकांसाठी आज उत्तम संधी उपलब्ध असून साहित्य चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यात साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. जिल्हा साहित्य संमेलन, साहित्य मेळावे, परिसंवाद, चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शने तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना साहित्य परिषदेशी जोडण्यावर विशेष भर दिला जाईल. बैठकीस साहित्य परिषदेचे अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महेश कराडकर यांनी मानले.

सांगली जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचकांना एकत्र आणत मराठी साहित्य चळवळीला नवी ऊर्जा देण्याची अपेक्षा या नव्या कार्यकारिणीकडून व्यक्त होत आहे. साहित्य संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.