चंदननगरमध्ये कोयते उगारून दहशत माजवणारी टोळी गजाआड; पोलिसांनी अवघ्या ६ तासांत ठोकल्या बेड्या
गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि दोन दुचाकी असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तby: सुदाम पेंढारे
पुणे (३० जून २०२६) - चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये मध्यरात्रीच्या वेळी धारदार हत्यारे हवेत फिरवून व नागरिकांच्या घरांवर दगडफेक करून दहशत माजविणाऱ्या ४ आरोपींसह एका अल्पवयीन (विधीसंघर्षीत) मुलाला पोलिसांनी अवघ्या ६ तासांत जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि दोन दुचाकी असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ जून २०२६ रोजी मध्यरात्री ३:०० वाजेच्या सुमारास ३ मोटारसायकलींवरून ६ ते ७ जणांचे टोळके डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये आले. या टोळक्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातातील धारदार हत्यारे (कोयते) हवेत फिरवली. तसेच, झोपलेल्या नागरिकांच्या घरांवर अचानक दगडफेक करत परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केले. या गंभीर प्रकाराची दखल घेत चंदननगर पोलीस ठाण्यात २६ जून रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा (गु.र.नं. २९०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चंदननगर पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे अवघ्या ६ तासांत पोलिसांनी गुन्हेगारांचा माग काढला आणि २७ जून रोजी ४ सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या, तर एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लोखंडी कोयता आणि २ मोटारसायकली असा एकूण १,२०,३००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राहुल भास्कर वाणी (वय १८ वर्षे, रा. वाघोली, पुणे), अनिकेत देविदास वैरागर (वय २० वर्षे, रा. वडगावशेरी, पुणे), राहुल सुनिल धुरंधर (वय २० वर्षे, रा. वडगावशेरी, पुणे), प्रेम गणपती गरड (वय १८ वर्षे, रा. वडगावशेरी, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर आणि खराडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार गोणे, मेमाणे, डांगे, घावटे, घुटे, लहाणे, पाटील व गायकवाड यांनी ही कामगिरी बजावली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करत आहेत.