गोटेवाडी येथे अशोक बापू घाडगे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित
by: अन्वर इनामदार


loading


गोटेवाडी (२ जून २०२६) - पशुसंवर्धन विभागातील ४० वर्षांची प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या श्री. अशोक बापू घाडगे यांच्या गौरवार्थ गोटेवाडी येथे भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमोद घाडगे यांनी प्रस्तावना सादर करताना आपल्या वडिलांच्या १९८६ ते २०२६ या चाळीस वर्षांच्या सेवाकाळाचा आढावा घेतला. विविध पाच गावांमध्ये सेवा बजावत असताना त्यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर पंचायत समिती तासगाव येथील मान्यवरांच्या हस्ते श्री. अशोक बापू घाडगे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच जय भारत समाज सेवा मंडळ आळतेचे संस्थापक अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार, जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ आणि गोटेवाडीचे माजी सरपंच विवेक नाना शेंडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी सरपंच विवेक नाना शेंडगे यांनी आपल्या मनोगतात श्री. घाडगे यांच्या सेवाभावी कार्याचा, कुटुंबीयांचा व त्यांच्या मुलांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जय भारत समाज सेवा मंडळ आळतेचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार यांनी आपल्या भाषणात पशुसंवर्धन विभागामध्ये श्री. घाडगे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. "बिनबोलणाऱ्या जनावरांवर योग्य उपचार करून त्यांची सेवा करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य आहे. कोणताही वाद अथवा शासकीय डाग न लागता सलग ४० वर्षे प्रामाणिक सेवा करणे ही अभिमानाची बाब आहे," असे सांगत त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना निरोगी, दीर्घायुषी व समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित सुमन आर आर (आबा )पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी श्री. अशोक बापू घाडगे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी गोटेवाडी येथील पोलीस सेवेत निवड झालेल्या युवतीचाही आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात आमदारांनी सरकारी सेवेमध्ये मुलींचे वाढते प्रमाण ही सकारात्मक बाब असल्याचे नमूद करत तिचे विशेष कौतुक केले. तसेच पशुसंवर्धन विभागातील सेवा ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून श्री. घाडगे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल ठोंबरे सर यांनी केले. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक गजानन बापू शेंडगे, गोटेवाडी सोसायटीचे चेअरमन व व्हा. चेअरमन, जिल्हा बँकेच्या हातनूर शाखेचे फील्ड ऑफिसर सुरेश पाटील व त्यांचा स्टाफ, सोसायटीचे सचिव पांडुरंग खुजट, वैभव पाटील, ग्रामपंचायत सदस्य व माजी सदस्य संजीव सोपान माने, माजी व्हा. चेअरमन पंडित नाना सूर्यवंशी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. रुपनर साहेब, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

तसेच गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. अशोक बापू घाडगे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

सत्काराला उत्तर देताना श्री. अशोक बापू घाडगे यांनी उपस्थित मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच आपल्या सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल आमदार रोहित पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.

शेवटी माजी सरपंच विवेक नाना शेंडगे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.