मरणोत्तर नेत्रदान: एक श्रेष्ठ दान - जनजागृती फलकांचे आज लोकार्पण
नाशिकमध्ये नेत्रदानासाठी मनपा आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचा पुढाकारby: सुदाम पेंढारे
नाशिक (१६ एप्रिल २०२६) - आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख अत्यंत क्लेशदायक असते, मात्र याच कठीण प्रसंगात जर नेत्रदानाचा निर्णय घेतला, तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांनी एखाद्या अंधाच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण येऊ शकतो. याच उदात्त विचाराने प्रेरित होऊन नाशिक महानगरपालिका (NMC) आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स नाशिक (APN) यांनी एकत्रितपणे शहरात नेत्रदान जनजागृतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे.
नाशिकमधील प्रत्येक आयसीयू बाहेर झळकणार प्रेरणादायी फलक
या मोहिमेचा एक अभिनव भाग म्हणून, नाशिकमधील सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागाबाहेर (ICU) नेत्रदानाचे महत्त्व सांगणारे आणि नातेवाईकांना प्रोत्साहित करणारे माहितीपर फलक लावले जाणार आहेत. ही संकल्पना नाशिक महानगरपालिकेसोबत काम करणारे नेत्रतज्ज्ञ आणि एशोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
महापौर हिमगौरी आहेर (आडके) यांच्या हस्ते अनावरण
या जनजागृती फलकांचे लोकार्पण आज नाशिक महानगरपालिकेच्या महापौर दालनात महापौर हिमगौरी आहेर (आडके) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी नाशिकच्या आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स नाशिकचे अध्यक्ष, डॉ. समीर चंद्रात्रे व सचिव डॉ. प्रितम अहिरराव तसेच मनपाचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
मरणोत्तर नेत्रदान: एक श्रेष्ठ दान
नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर करणे आणि गरजूंना वेळेत दृष्टी मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे जळून किंवा मातीत मिसळून जाण्यापेक्षा, ते कोणाला तरी सृष्टी पाहण्याची संधी देत असतील तर तेच खरे पुण्य आहे
, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या फलकांमुळे आयसीयू बाहेर असलेल्या नातेवाईकांना नेत्रदानाची माहिती सहज उपलब्ध होईल आणि इच्छुक कुटुंबीयांना तत्काळ संपर्क साधता येईल. नाशिक महानगरपालिका आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या या उपक्रमाचे शहरभरात कौतुक होत असून, यामुळे शहरातील नेत्रदानाचा टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.