रुग्णांचे हक्क आणि वैद्यकीय उपचारांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी आमदार रोहित सुमन आर आर (आबा ) पाटील यांना निवेदन

महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयकात आवश्यक सुधारणा करण्याची मागणी; विधानभवनात विषय मांडण्याचे आमदारांचे आश्वासन
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2026-11-16) - तासगाव : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी, पारदर्शक आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, तसेच रुग्णांचे मूलभूत मानवी हक्क सुरक्षित राहावेत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. अनवर इनामदार यांनी आमदार मा. रोहित सुमन आर. आर. (आबा) पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स (नोंदणी व नियमन) विधेयक, २०२६ मध्ये रुग्णांचे मूलभूत हक्क, वैद्यकीय उपचारांच्या शुल्कावर प्रभावी नियंत्रण, आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि सक्षम तक्रार निवारण यंत्रणा यांचा समावेश करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. सध्या सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील अवाजवी उपचार शुल्क, तपासण्यांचे वाढते दर, उपचारांच्या खर्चाबाबत अपुरी माहिती, वैद्यकीय बिलांमधील अनियमितता आणि तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या हिताचे संरक्षण करणारा आणि वैद्यकीय आस्थापनांना उत्तरदायी ठरवणारा सक्षम कायदा निर्माण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनामध्ये वैद्यकीय उपचारांचे दरपत्रक सार्वजनिक करणे, उपचारांपूर्वी खर्चाचा लेखी अंदाज देणे, रुग्णांना वैद्यकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या संमतीशिवाय उपचार न करणे (लागू आपत्कालीन अपवाद वगळता), बिलाच्या थकबाकीवरून मृतदेह रोखून धरण्यास प्रतिबंध, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र रुग्ण तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे तसेच नियामक परिषदेमध्ये मानवाधिकार आणि सामाजिक संस्थांना प्रतिनिधित्व देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. यावेळी आमदार मा. रोहित आबा पाटील यांनी या विषयाची तातडीने दखल घेतली. तसेच महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयकासंदर्भात विधानभवनात चर्चा घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभागीय संघटक आलमशाम मोमीन, सामाजिक कार्यकर्ते भरत नाना थोरात, ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब नारायण थोरात तसेच सदाशिव कुंडलिक माने आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णांचे हक्क सुरक्षित राहावेत, वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावेत आणि आरोग्यसेवेमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण व्हावे, या व्यापक जनहिताच्या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आले.