तोतया नगरसेवक बनून नागरिकांना लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड
गुन्हे शाखेची धडक कारवाईby: आफताब अहमद
मुंबई (२१ नोवेंबर २०२६) - स्थानिक नगरसेवक किंवा राजकीय पक्षाचा शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करून नागरिकांचे दागिने आणि रोकड हातोहात लांबवणाऱ्या एका ५६ वर्षीय सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (कक्ष-३) वसई-विरार परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. या भामट्यावर तब्बल ६१ गुन्हे दाखल असून, तो मुंबई, नवी मुंबई आणि लोहमार्ग पोलिसांना ७ गुन्ह्यांमध्ये हवा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या एका तासात या आरोपीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना गंडा घातला होता. तो नागरिकांना गाठून स्वतःची ओळख स्थानिक नगरसेवक किंवा शाखा अध्यक्ष अशी करून द्यायचा. "परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे," अशी भीती दाखवून, तो नागरिकांना बोलण्यात गुंतवायचा. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड सुरक्षितपणे त्यांच्याच पिशवीत बांधून ठेवण्याचा बहाणा करायचा. मात्र, याच वेळी हातचलाखीने तो दागिने आणि रोकड स्वतःकडे काढून घेऊन पोबारा करायचा. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात अशाच प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे मुंबई आणि उपनगरांमध्ये दाखल झाले होते, मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या वाढत्या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने तांत्रिक आणि मानवी तपासाच्या (Human Intelligence) आधारे समांतर तपास सुरू केला. अखेर २० नोव्हेंबर रोजी नायगाव पूर्व (वसई-विरार) येथील महालक्ष्मी नगर, स्टार सिटी परिसरातून पोलिसांनी या ५६ वर्षीय आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. हा आरोपी मूळचा भिवंडी येथील रहिवासी आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी तब्बल ६१ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच, मुंबई, मुंबई लोहमार्ग (रेल्वे) आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७ गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे आरोपी (Wanted) होता. पुढील तपासासाठी त्याला आता ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य) सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश जोष्टे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काकळीज आणि अंमलदार विनोद परब, रविंद्र देवाड, वैभव गिरकर, बिपीन कोचरेकर, वासुदेव परब, हितेश म्हात्रे व विकास चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.
AI image used