कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटींचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा..

हजारो भाविकांची उपस्थिती : मोहरममध्ये हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दर्शन
by: अन्वर इनामदार


loading


कडेगाव(सांगली) (१७ जुलै २०२४) - अतिशय सुंदर मोहरम, हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, अशी ऐक्याची हाक देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पारंपरिक पद्धतीने थाटात झाला. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील भाविकांची गर्दी लक्षणीय होती.

सांगली जिल्ह्यातील कडेगावात १५० वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी (दि. १७) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणले. त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.सकाळी मानाचा सातभाई ताबूत उचलला. येथून भेटी सोहळ्याला प्रारंभ झाला. हा ताबूत बीजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आले. तेथे बागवान, आत्तार, शेटे, आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आले. तेथे पाटील यांचामोठा आकर्षक ताबूत उचलला आणि सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम, देशपांडे या उंच ताबुतांच्या प्राथमिक भेटी झाल्या.

त्यानंतर सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौकाकडे (मोहरम मैदान) निघाले. यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान, वाटेत तांबोळी, अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलला. नंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित आले. त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यांमार्फत आणल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले.

यावेळी माजी आमदार मोहन कदम, माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जितेश कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, अनवर इनामदार, उपस्थित होते.