बालविवाह प्रतिबंध विषयावर मिरज येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
by: वसंत खांडेकर


loading


मिरज (२६ डिसेंबर २०२५) - मिरज येथील सद्गुरु आश्रम शाळा व इंग्लिश स्कूल या विद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, मिरज तालुका व आम्रपाली शैक्षणिक कला व क्रीडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. यावेळी आम्रपाली शैक्षणिक कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाश जकाते सर यांनी बालविवाह प्रतिबंधाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय वसंत (अण्णा) खांडेकर यांनी बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम तसेच त्यातून उद्भवणारे धोके याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय सिद्धार्थ ढेंडे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक माननीय हाक्के सर यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय वसंत अण्णा खांडेकर, तालुका सचिव सागर आठवले, सांगली–मिरज–कुपवाड शहर सचिव माननीय कुमार भंडारे, आम्रपाली कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाश जकाते सर, सामाजिक कार्यकर्ते माननीय सिद्धार्थ ढेंडे सर, तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालविवाहास आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.