आरगमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा काँग्रेस आघाडीला जाहीर पाठिंबा
खासदार विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे रणशिंगby: अन्वर इनामदार
मिरज, आरग (४ फेब्रुवारी २०२६) - आरग येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत जाहीर पाठिंबा देण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा प्रभारी हेमंत भोसले यांनी उमेदवार सौ. प्राजक्ता प्रशांत चौगुले व श्री. आप्पासो कवाळे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आरग परिसरातील काँग्रेस आघाडीची राजकीय ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
यावेळी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना हेमंत भोसले म्हणाले, -
शिव, शाहू, फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या विचारधारेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठामपणे पाठिंबा देत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. राजेंद्र गवई तसेच सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने, एकजुटीने व प्रामाणिकपणे लढवली जात आहे.
उमेदवारांचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, -
आरगचे दोन्ही उमेदवार प्रामाणिक, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले आहेत. जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिल्यास ते खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करतील. विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मी देतो.
यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, -
पैशाच्या जोरावर दिल्या जाणाऱ्या आमिषांना किंवा भुलथापांना बळी न पडता विचारांवर आधारित मतदान करावे.
या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा महासचिव गौस नदाफ, जिल्हा सदस्य अनवर इनामदार, तासगाव तालुका अध्यक्ष शंकर तांदळे, उपाध्यक्ष सुनील लोहार यांच्यासह मिरज तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.