तासगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जय भारत इन्फोटेक व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा संयुक्त उपक्रम; मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती
by: प्रतिनिधि


loading


तासगांव, सांगली (2026-04-14) - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तासगाव येथे भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तासगाव येथील जय भारत इन्फोटेक कार्यालयात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सांगली जिल्हा व जय भारत इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगलीचे उपाध्यक्ष मा. डॉ. विद्यासागर कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. कृष्णा नाना म्हेत्रे यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकर यांचे भारतीय समाजरचनेतील व संविधान निर्मितीतील अमूल्य योगदान विशद केले. त्यांनी सामाजिक समतेचा संदेश सर्वांनी आचरणात आणण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष व जय भारत इन्फोटेकचे मालक श्री. अनवर इनामदार यांनी भूषविले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

जयंतीनिमित्त उपस्थितांसाठी चहा व जिलेबीचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

या प्रसंगी सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. विद्यासागर कांबळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे विभागीय सहसंघटक श्री. आलमशहा मोमीन, मानवाधिकार संघटनेचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष श्री. अशोक हिरगुडे, सांगली जिल्हा सहसचिव श्री. दीपक पाटील, सांगली जिल्हा प्रेस सेक्रेटरी श्री. गौस नदाफ,सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत नाना थोरात, ज्येष्ठ नागरिक श्री. बाबू अण्णा थोरात, पत्रकार श्री. संभाजी माळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.