तासगाव तालुक्यात सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद

चिंचणी येथे सुंता (खत्ना )कॅम्प आयोजित
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2026-04-28) - नूर उल इस्लामिक सामाजिक सेवा संस्था, मालगाव आणि सुन्नत जमात चिंचणी यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील हजरत मस्तान शहा वली दर्गाह शरीफ येथे अल्पदरात मेडिकल सुंता (खतना) कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पला तासगाव, चिंचणी तसेच सांगली जिल्ह्यातील बोरगाव, नेलकरंजी, डोंगरसोणी, सांगली, बारामती, कोल्हापूर आदी विविध भागांतील गरजू नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चाळीसहून अधिक लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत आपल्या मुलांची सुंता करून घेतली. नूर उल इस्लामिक सामाजिक सेवा संस्था गेल्या तीन-चार वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच सुंता (खतना) कॅम्पसारखे विविध उपक्रम राबवून समाजसेवा करत आहे. संस्थेचे सचिव गौस मुजावर (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, मिरज उपाध्यक्ष) आणि युवानेते फारूक मुल्ला यांच्या पुढाकारातून हे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजसेवा करणे ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी वेळ, पैसा आणि समर्पण आवश्यक असते. नूर इस्लामिक सामाजिक संस्था निस्वार्थ भावनेने कार्य करत असून अशा संस्थांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.” तसेच गरजू आणि दुर्बल घटकांना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे सचिव गौस मुजावर यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. चिंचणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भागवत दादा जाधव यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दर्गा कमिटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपसरपंच भागवत दादा जाधव, चिंचणी विकास सोसायटीचे संचालक मोहन तुकाराम पाटील, युवानेते समर्जित भैय्या अविनाश काका पाटील, फारूक मुल्ला, रईस पठाण, हाफिज अकबर अली, डॉ. शब्बीर मुलानी, ओबीसी संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष आयनुद्दीन मुजावर, संस्थेचे खजिनदार उमरफारूक मुजावर, महमदरफिक मुजावर, हाफिज साबीर, हाफिज नेहाल, अन्सार मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुन्नत जमात चिंचणी कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सुन्नत जमात चिंचणी, ओबीसी तासगाव तालुका अध्यक्ष फारूक मुल्ला, हाफिज अकबर अली, तोशिफ मुजावर, रईस पठाण तसेच नूर उल इस्लामिक संस्थेचे सदस्य आणि चिंचणी परिसरातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.