सांगलीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार
कुलदीप देवकुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तby: प्रतिनिधि
सांगली (२७ एप्रिल २०२६) - सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून जोरदार बांधणी सुरू असून, या पार्श्वभूमीवर कुलदीप देवकुळे यांची शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा (पश्चिम महाराष्ट्र विभाग) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कुलदीप देवकुळे यांना नियुक्तीपत्र डबल महाराष्ट्र केसरी तथा लोकसभा माढा संपर्कप्रमुख पैलवान चंद्रहार दादा पाटील आणि शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना चंद्रहार दादा पाटील आणि संजय बापू विभुते यांनी सांगितले की, शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यात येणार आहे. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शिव उद्योग सहकार सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी आपल्या संदेशात विश्वास व्यक्त करताना म्हटले की, कुलदीप देवकुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम करतील.
तसेच सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिव उद्योग सहकार सेना पुढाकार घेणार असून, शेतकरी, कामगार आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर संघटना ठोस भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कुलदीप देवकुळे यांच्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यात शिवसेना आणि शिव उद्योग सहकार सेनेच्या कार्याला नवे बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.