बाळासाहेब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त तुरची येथे गरजू महिलांना साडी वाटप

सामाजिक बांधिलकी जपत गरजू , दिव्यांग व विधवा महिलांना मदतीचा हात
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2026-09-06) - तुरची, दि. ६ सप्टेंबर : मा. अब्दुलरहीम उर्फ बाळासाहेब मुल्ला, ध्वनी शास्त्रज्ञ यांच्या ५ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त साडी वाटपाचा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी तुरची येथील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी गरजू, दिव्यांग व विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर उर्फ आप्पालाल इनामदार, तुरची ग्रामपंचायतीचे प्रशासक विकास डावरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तासगाव तालुका उपाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, दिलावर मुल्ला गुरुजी, सरफराज मुल्ला, पी.सी. सिस्टम कम्प्युटरचे मालक मुबीन मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना तुरची ग्रामपंचायतीचे प्रशासक विकास डावरे म्हणाले, “बाळासाहेब मुल्ला यांनी तुरची गावातील गरजू महिला भगिनींसाठी साडी वाटपाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या महिलांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत आणि त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करतो.” हर्षवर्धन पाटील यांनी बाळासाहेब मुल्ला यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व महिला भगिनींचे आभार मानले. अनवर उर्फ आप्पालाल इनामदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “बाळासाहेब मुल्ला यांना नुकताच भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सामाजिक कार्य अतुलनीय असून विद्यार्थ्यांपासून सामाजिक क्षेत्रापर्यंत ते सातत्याने मदतीसाठी तत्पर असतात. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा देतो. तसेच या सामाजिक उपक्रमात सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार.” कार्यक्रमाचे आभार दिलावर मुल्ला गुरुजी यांनी मानले. यावेळी तुरची ग्रामपंचायतीचे प्रशासक विकास डावरे, हर्षवर्धन पाटील, येरळा एक्सप्रेस न्यूजचे संपादक शकील मुल्ला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार, नवीन मोमीन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वेळ देऊन आत्मीयतेने उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या महिला भगिनींचे आभार मानण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.